केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी म्हणून प्राधान्यक्रमाने समावेश केलेल्या सोलापूर शहरात भरीव विकास होण्याच्या आशा आकांक्षा बाळगून असलेल्या सोलापूरकरांमध्ये सध्या वेगळ्याच चिंतेने अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीसह इतर पूरक विकासाच्या घोषणा होऊन वर्ष-दोन वर्षे उलटत असली तरी विकासाची पाऊलवाट कोठे दिसत नाही. तर उलट, महापुरुषांच्या नावांच्या अस्मितेचे राजकारण खेळत जाती-जातीत भांडणे लावण्याचा व त्यातून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे उद्योग सत्तेतील जबाबदार नेतृत्वाकडून होत आहेत. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न करीत असताना इकडे या विद्यापीठाला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव डावलण्यात आल्याने वीरशैव लिंगायत समाजात संतापाची भावना वाढली आहे. हे कमी आहे म्हणूनच की काय, लिंगायत समाजाची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात सोलापूर रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून आता नवा वाद उद्भवला आहे. हा वाद आणखी कसे वळण घेतो, याचा विचार करताना सोलापूरचे सामाजिक वातावरण कलुषित होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वास्तविक पाहता अवघ्या १२ वर्षांपूर्वी देशात एकमेव सोलापूर जिल्ह्य़ासाठी उभारणी झालेल्या सोलापूर विद्यापीठाला बाल्यावस्थेमुळे अजूनही धडपणे पावलेही टाकता नाहीत. केवळ ११८ महाविद्यालयांचा अंतर्भाव असलेल्या या विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता तथा विकास कोसो दूर असताना त्याबाबत साकल्याने विचार होणे अपेक्षित होते. त्याबद्दल खंत ना खेद अशीच सार्वत्रिक स्थिती आहे. प्राप्त परिस्थितीत सोलापूरची तरुण मुले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी सोलापूर विद्यापीठाकडे आकर्षित होत नाहीत. बहुसंख्य हुशार मुले शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी सोलापूरपेक्षा पुण्याला प्राधान्य देतात; परंतु त्याचे गम्य कोणालाच वाटत नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे हे विद्यापीठ जन्माला आले तेव्हाच त्यास कोणाचे नाव द्यायचे, यासाठी एका पाठोपाठ एक वेगवेगळे प्रस्ताव प्रस्ताव येत गेले. त्यापैकी कोणत्या तरी एका महापुरुषाचे नाव देणे म्हणजे इतर समाज घटकांना अंगावर घेण्यासारखे होते. त्याचा नेमका अंदाज घेऊन विद्यापीठाच्या उभारणीचे शिल्पकार समजले जाणारे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोणतीही घाईगडबड न करता परिपक्वता दाखवत नामांतराचा मुद्दा गुंडाळून ठेवला होता. सोलापूर हेच नाव विद्यापीठाला कायम राहणे योग्य आणि सार्वजनिक हिताचे आहे, याचेच संकेत शिंदे यांच्याकडून मिळाले होते.
या पाश्र्वभूमीवर अलीकडे राज्यातील धनगर समाजाने अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यासाठी तर मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी मोठे आंदोलन छेडले असताना या आरक्षणाची पूर्तता न झाल्यास त्याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल, याची जाणीव सत्ताधारी भाजपला होणे स्वाभाविक आहे. धनगर व मराठा समाजाच्या आरक्षणाचा क्लिष्ट झालेला गुंता पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी सुटण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला खूश ठेवण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला. त्यावरून सोलापुरात मोठे काहूर माजले. सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वरांचे नाव देण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाजाने विद्यापीठाच्या जन्मापासून केली होती. त्यासाठी धनगर समाजाप्रमाणे लिंगायत समाजानेही आंदोलन करून शक्तिप्रदर्शन घडविले होते. तेव्हा नामांतराच्या मुद्दय़ावर धनगर व लिंगायत समाज एकमेकांसमोर उभे ठाकले असताना त्यावर सामंजस्याने मार्ग काढण्याची भूमिका जबाबदार म्हणून राज्यकर्त्यांना पार पाडावी लागते. एखाद्या जातीशी निगडित महापुरुष किंवा देवतेचे नाव द्यायचे झाल्यास त्यासाठी सर्वमान्य तोडगा काढवा लागतो. त्याकरिता सर्व घटकांना विश्वासात घ्यावे लागते; परंतु झाले भलतेच. नागपुरात धनगर समाजाच्या मेळाव्यात आरक्षणाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे जोरदारपणे पुढे रेटली असताना त्यातून तात्पुरती का होईना सुटका करून घेण्यासाठी व धनगर समाजाला ‘लॉलीपॉप’ दाखविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागचापुढचा कसलाही विचार न करता अतिशय घाईगडबडीने सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला. वीरशैव लिंगायत समाजात या निर्णयाचे नाराजी व संतापाचे पडसाद उमटले. योगायोगाने सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे याच लिंगायत समाजाचे आहेत. शिवाय देशमुख घराण्याच्या माध्यमातून ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरीही आहेत. विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वरांचे नाव देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे सर्वात जास्त अडचण झाली ती पालकमंत्री देशमुखांची. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली.
रेल्वे स्थानकाला बसवेश्वरांचे नाव?
सत्ता महत्त्वाची की समाज, याचा फैसला करायचा तर कसा करायचा, या कोंडीत पालकमंत्री देशमुख सापडले. याच संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी मग कोणाची मागणी नसताना सोलापूर रेल्वे स्थानकाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आणला. त्यातून नाराज लिंगायत समाज शांत होईल, असे यामागचे गणित होते; परंतु कसचे काय, लिंगायत समाज आणखी भडकला. उलट, त्यातून महापुरुषांच्या नावांनी वेगळाच खेळखंडोबा सुरू झाला. सोलापूर रेल्वे स्थानकाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्याची कोणाचीही मागणी नसताना तसा प्रस्ताव पालकमंत्री देशमुखांनी स्वत:चा मतलब साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत मराठा समाजाच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देण्याच्या मागणीचा प्रस्ताव लावून धरला. हा प्रस्ताव जिजाऊ माता जयंती मध्यवर्ती मंडळाच्या पुढाकाराने चार वर्षांपूर्वी महापालिका सभागृहात मंजूर करून घेतला होता. आता महात्मा बसवेश्वरांच्या नावाचा प्रस्ताव पुढे येताच जागे होऊन तेवढेच आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी लगोलग थेट रेल्वे स्थानकावर धडक मारली आणि रेल्वे स्थानकावर जिजाऊंच्या नावाचा फलकही झळकावला. ही त्यांची प्रतिक्रिया पाहता सोलापूरकर आणखी अस्वस्थ झाले आहेत. लिंगायत समाजानेही आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करीत येत्या सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. तसेच विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचाही निर्णय लिंगायत समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवा वीरशैव युवक संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी जाहीर केला आहे.