टॉयलेट शीटवर लिहिलेल्या ‘हिंदुस्थान’ या शब्दावर आक्षेप घेत भाजपचे खासदार हंसराज अहीर यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सलग सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर शीटवरून हा शब्द काढण्याचे आदेश गृहखात्याला द्यावे लागले आहेत.
टॉयलेटच्या शीट व बेसिन तसेच स्नानगृहात लागणाऱ्या इतर वस्तू तयार करणाऱ्या हिंदुस्थान सॅनेटरी वेअर या कंपनीने तयार केलेल्या प्रत्येक वस्तूवर हिंदुस्थान हा शब्द लोगोच्या स्वरूपात वापरणे सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.
‘हिंदुस्थान’ हा शब्द असलेल्या टॉयलेटच्या शीटवर बसणे योग्य वाटत नाही. त्यामुळे या संदर्भात काही तरी करा, अशी तक्रार एका जागरूक नागरिकाने भाजपचे खासदार हंसराज अहीर यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेत अहीर यांनी अनेक ठिकाणी ही शीट बघितली असता, त्यावर हिंदुस्थान हा शब्द असल्याचे दिसून आले. यानंतर अहीर यांनी हा शब्द वगळण्याचा आदेश या कंपनीला द्यावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. प्रारंभी हे काम आमच्या अखत्यारीत येत नाही, असे केंद्रातील १३ खात्यांनी अहीर यांना कळवून टाकत हात झटकले. अखेर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार केली. या मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाचे मत मागितले. वाणिज्य खात्यातील अधिकाऱ्यांनी टॉयलेट शीटवर हा शब्द असणे योग्य नाही, असा अभिप्राय दिल्यानंतर गृह मंत्रालयाने या कंपनीला एक पत्र पाठवून शीट तसेच बेसिन वरून हा शब्द तातडीने काढून टाकावा, असे निर्देश दिले. या पत्राची प्रत अहीर यांनासुद्धा पाठवण्यात आली आहे.
हिंदुस्थान शब्द नोंदणीकृत
गृह मंत्रालयाने हिंदुस्थान हा शब्द नोंदणीकृत केला असून कोणत्याही कंपनीला अथवा व्यवसायिकाला या शब्दाचा वापर करण्याआधी गृहखात्याची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती अहीर यांनी दिली. गृह मंत्रालयाच्या पत्राची दखल घेत हिंदुस्थान सॅनेटरी वेअर कंपनीने सुद्धा या शब्दाचा तयार केलेल्या वस्तूवर वापर करणे बंद केले असून, देशातील जनतेच्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश वापरामागे नव्हता, असे गृहमंत्रालयाला कळवले आहे.

Story img Loader