सध्या राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्भूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षाचे मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थिती आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, या बैठकीत शहरांच्या नामांतरांचा देखील एक प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवरच, आजच्या या बैठकीत पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती देखील बाहेर आली आहे.
तर, या अगोदर देखील पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर असं करण्यात यावं अशी मागणी संभीजी ब्रिगेडकडून करण्यात आली होती.
राजकीय उलथापलथीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठकी वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून तीन नामांतराचे प्रस्ताव आणण्याची तयारी आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बैठक सुरू होण्या अगोदर काँग्रेसचे दोन मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे बैठकीतून निघून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते का निघून गेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.