Namo Shetkari Nidhi Yojana 6th instalment : नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ – ६व्या हप्त्याचे ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण केले जाणार असल्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
उद्यापासून मिळाणार लाभ
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत २१६९ कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरणासंबंधी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रति वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतात.
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन २०२३-२४ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पी.एम. किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रति शेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी ६ हजार रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत १२ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ दिला जा आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला होता.
आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ५ हप्ते वितरीत करण्यात आलेले असून राज्यातील ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना रू. ८९६१.३१ कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर, २०२४ ते मार्च, २०२५ या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्यातील एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रू. १९६७.१२ कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे. या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण ६५,०४७ लाभार्थीना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.