महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. १० मार्च रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये बदल होणार असल्याची घोषणा पटोले यांनी भंडारदऱ्यामधील एका जाहीर सभेमध्ये केली. १० मार्च रोजीच उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. १० मार्च रोजी होणारा मंत्रीमंडळ फेरबदल हा राजकीय भूकंप असेल असंही नाना म्हणालेत. मंगळवारी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊथ यांनी भाजपावर महाराष्ट्रातील माहविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे आरोप केले होते. त्याच प्रार्श्वभूमीवर पटोलेंच्या या नवीन दाव्याने राजकीय वर्तुळामध्ये नवीन चर्चांना उधाण आलंय.
महाराष्ट्रामध्ये सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. “भाजपाच्या काही मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. त्यांनी मला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. तसं केलं नाही तर सरकार पाडू अशी धमकी दिली होती,” असं राऊत कालच म्हणाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशीच नाना पटोलेंनी आज एका जाहीर सभेमध्ये नाना पटोलेंनी राज्यातील मोठ्या घडामोडीचे संकेत दिलेत.
महाराष्ट्रामध्ये १० मार्च रोजी राजकीय भूकंप येणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मोठे बदल लवकरच दिसून येतील असा दावा पटोले यांनी आपल्या भाषणात केलाय. पटोले यांनी कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होतील असंही म्हटलंय. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात छोटा पक्ष हा काँग्रेस आहे. त्यामुळे आता पटोले यांच्या या दाव्यावर सरकारमध्ये सत्तेत असणारे इतर दोन मोठे पक्ष काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये उघड होईल. मात्र देशातील पाच महत्वाच्या राज्यांमधील निकालाच्या दिवशीच महाराष्ट्रामध्येही मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत नाना पटोलेंनी दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. आता यावर काँग्रेससोबत सत्तेत असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांची नजर आहे.