प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्ट मंत्री आणि राजकीय नेत्यांवरून थेट प्रश्न विचारला. “मी १०० रुपये आल्यावर ३० रुपये कर भरतो. तुम्ही आणखी १८ रुपये जीएसटी घेता. हे करूनही आमच्या चौकशा होतात, तुमच्या चौकशा का होत नाहीत?” असा सवाल नाना पाटेकरांनी केला. तसेच आज निवडून येणारा मंत्री, नगरसेवक पुढल्या वर्षी कोट्यावधी होतो, असंही नाना पाटेकरांनी नमूद केलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते मंगळवारी (१२ ऑक्टोबर) लोकमतच्या कार्यक्रमातील मुलाखतीत बोलत होते.
नाना पाटेकर म्हणाले, “यशवंतराव गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर २५ हजार रुपयेही नव्हते. आपले मंत्री, नगरसेवक आज निवडून आले की पुढच्या वर्षी कोट्याधीश असतात. त्याची चौकशी का होत नाही? मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का लक्षात येत? एकनाथराव, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? मी १०० रुपये आल्यावर ३० रुपये उत्पन्न कर भरतो. तुम्ही १८ रुपये आणखी जीएसटी घेता. हे करूनही आमच्या चौकशा होतात, तुमच्या चौकशा का होत नाहीत?”
“भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जाऊन आलेल्यांना लोक वारंवार निवडतात”
नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भ्रष्टाचार केवळ राजकारणाला नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. दुर्दैवाने ही कीड संपवायची असेल, तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. कारण, भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जाऊन आलेले, अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक खूप मोठ्या बहुमताने निवडून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात. त्यामुळे समाजात भ्रष्टाचाराविषयी कुठलाही तिरस्कार तयार होत नाही.”
हेही वाचा : “कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना”, शिंदे-फडणवीसांसमोर नाना पाटेकरांचं वक्तव्य
“गुन्हे दाखल असूनही तोच उमेदवार निवडून येतो”
“जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. अनेकदा लोक विचारतात की त्या उमेदवारावर इतके गुन्हे आहेत तरी कसं तिकीट देता? तेव्हा आम्हाला सांगावं लागतं की त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, पण तोच निवडून येतो. दुसरीकडे सुंदर, साळसुद, स्वच्छ उमेदवार उभं केलं की त्याचं डिपॉझिट जप्त होतं,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.
“हे केवळ राजकीय नेते बदलू शकत नाही”
“हे केवळ राजकीय नेते बदलू शकत नाही समाजाला बदलावं लागेल. केवळ समाजावरही टाकून जमणार नाही, तर राजकीय नेत्यांनाही हे परिवर्तन झालं पाहिजे असं वाटावं लागेल. मोदी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झालं आहे. याला वेळ लागेल. ही कीड लागली आहे, पण किटकनाशक तयार होतंय. ते किटकनाशक ही कीड नक्की दूर करेल, असा मला विश्वास आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.