मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत ‘लोकमत’ या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी शिंदे-फडणवीसांना अनेक प्रश्न विचारले. सोबतच नाना पाटेकर यांनी राजकीय तसेच सामाजिक विषयावरही भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात वापरली जाणारी शिवराळ भाषा तसेच असंसदीय शब्दांच्या होत असलेल्या वापरावर शिंदे-फडणवीस या द्वयींना प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना नाना पाटेकर यांनी देंवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही उल्लेख केला. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख करतातच देवेंद्र फडणवीस यांनाही हसू फुटले.
हेही वाचा>>> “एवढा उजेड आहे, आता मशाल कशाला? लोकांना..,” उद्धव ठाकरे गटाच्या नव्या निवडणूक चिन्हावरून नारायण राणेंचे टीकास्त्र
मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं?
शिंदे-फडणवीस यांची मुलाखत घेताना नाना पाटेकर बोलत होते. यावेळी बोलताना “देवेंद्र फडणवीस हा माणूस मुद्देसूद बोलतो. त्याबद्दल वाद नाही. त्यांच्या बोलण्यात भावनेचा लवलेश नाही. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या बोलण्यात फक्त भावना असतात. त्यामुळे या दोघांचा एक चांगला समन्वय आहे. कुठलेही सरकार असले तरी मला सगळेच चांगले दिसतात. मला वाईटामध्ये चांगले शोधायची सवय आहे. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही काहीतरी चांगलं कराल, अशी अपेक्षाच नव्हे तर खात्री आहे,” असे नाना पाटेकर म्हणाले.
हेही वाचा>>> उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “एकनाथ शिंदेच आमचे…”
“राजकारणात किती शिवराळ भाषा वापरली जाते. मी जेव्हा बोलतो तेव्हा त्यात माझे संस्कार दिसतात. गलिच्छातील गलिच्छ शब्द कसा वापरायचा याची एक परिसीमा असते. ती सीमा राजकीय नेत्यांनी सांभाळायला हवी. ती नाही सांभाळली तर आपण आपल्या मुलांपुढे कोणते आदर्श ठेवणार आहोत. त्याच्यावर काही नियम आहेत का?” असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.
पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी अमृता फडणवीस यांचे नाव घेतले. हे नाव घेताच सभागृहात हशा पिकला. तसेच देवेंद्र फडणीस यांनाही हसू फुटले. “आम्ही काही चुकीचं केलं की तुम्ही आम्हाला शिक्षा करता. तुम्ही काही केलंत तर आम्ही काय करायचं? असंसदीय शब्दांचा उपयोग तुम्ही करता त्याचं काय? तुमच्या पत्नी म्हणाल्या त्यांना (देवेंद्र फडणवीस) चांगलं खोदा. मी म्हणालो तुम्ही करताय ते कमी आहे का?” असे नाना पाटेकर मिश्किलपणे म्हणाले. नाना पाटेकर यांचे हे शब्द ऐकताच देवेंद्र फडणवीस मंचावर हसू लागले. तसेच खाली बसलेल्या प्रेक्षकांनाही हसू फुटले.