‘नाम’तर्फे ५०७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत
मुलींनो आता हरायचे नाही. पुढे जायचे. आपल्या मुलांना शिकवा, आत्महत्येचा विचार डोक्यात आणू नका. तुमच्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढेन, असे तळमळीचे आवाहन करतानाच जगण्यासाठी विश्वास देत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मदतीचा हात दिला.
‘नाम’ फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी ५०७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज स्वाध्याय मंदिर परिसरात आर्थिक सहायता कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मकरंद अनासपुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपला स्वानुभव सांगताना पाटेकर म्हणाले की, माझी लहानपणीची स्थिती अत्यंत हलाखीची होती. घराला कुणाचाही आधार नव्हता. मला सभोवतालच्यांनी सांभाळले, सावरून घेतले. नवव्या वर्गात असताना मी नोकरीस सुरुवात केली. स्वत:ची वाटचाल सुरू केली. त्यावेळी इतरांनी केलेली मदत पैशांनी मोजता येणार नाही. त्यामुळे आज ‘नाम’कडून मिळणारी मदत तुटपुंजी वाटत असली तरी ही केवळ एक सुरुवात आहे. आत्महत्येचा विचार तुम्ही मनात येऊ देऊ नका. शेतकरी सततच्या नापिकीने आत्महत्या करतो. मात्र, त्यामुळे त्याचे कुटुंब उघडय़ावर पडते. त्यावर आत्महत्या हा उपाय असू शकत नाही. हे पाहतच मी शेतकरी कुटुंबास मदत करण्याचा निर्णय घेतला. आता शेवटच्या श्वासापर्यंत हे काम सुरू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मकरंद अनासपुरे म्हणाले की, पैसे कपाटात मोजून ठेवण्यापेक्षा ते सद्मार्गी लावा. या माझ्या मुली विधवा कशा झाल्या, याचा एक बाप म्हणून विचार केल्यावर मी मदत करण्याचे ठरवले. हे काम करताना मला चित्रपटापेक्षा लाखपटीने आनंद झाला. ते काम मी एकटा करू शकत नाही. ते काम कुण्या पक्षाचेही नाही. सर्वानी मिळून मदत करू या, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्य़ातील ५०७ कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे मदतीचे धनादेश देण्यात आले. संचालन संजय इंगळे तिगावकर व हरीश इथापे यांनी केले. ‘नाम’चे विदर्भ-खांदेश प्रमुख श्याम पेठकर म्हणाले, यापुढे विविध उपक्रमातून मदत देण्याचा प्रयत्न असेल. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना एकत्र करून त्यांचे गट तयार केले जातील. मुलांचे शिक्षण, लग्न अशा कामात याद्वारे मदत दिली जाईल. उद्योगशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
‘आता गृहउद्योग सुरू करेन’
या कार्यक्रमादरम्याान नंदा अलोणे हिने अनावर झालेले अश्रू आवरून मनोगत व्यक्त केले. मुलांसाठी आम्ही जगत आहोत. आमच्याही मनात आत्महत्येचे विचार येतात. आता ‘नाम’च्या मदतीतून गृहउद्योग सुरू करेन, असे त्या म्हणाल्या. मेघे वैद्यकीय संस्थेतर्फे सर्व कुटुंबांना आरोग्य विमा कार्ड देण्यात आले.