नाम फाऊंडेशनतर्फे ३५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत

सरकारवर बोललं तर संघर्ष सुरू होईल. त्यासाठी वेगळी संघटना काढावी लागेल. मागील सरकारने काय केलं, नवीन सरकार काय करतय यावर चर्चा करण्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार महत्वाचा आहे. कोणत्याही सरकारला नाव ठेऊ नका. प्रश्न आपला आहे म्हणून सोडवा, असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी दिला.
नाम फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्य़ातील ३५३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्यता कृतज्ञता उपक्रमातंर्गत धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीराचे बोल ऐकविले.
कुटुंबाचा विचार न करता आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही. अनेक जबाबदाऱ्या शिल्लक असताना निघून जाणे फार वाईट आहे. गेलेला माणूस परत येणार नाही हे माहीत असतानाही आशेने वाट पाहणाऱ्या माता, भगिनी, मूले यांना सर्व दु:ख विसरून पुन्हा शेतावर जावे लागेल. पोटाची खळगी भरण्यासाठी उभे राहावे लागेल. गरजू शेतकऱ्यांना मदत करून त्याचं जगणं सुसह्य़ करता येईल का, हे शोधणे गरजेचे आहे. डोंगराइतकं दु:ख असतानाही आपण सण साजरे करतो. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार वाटला पाहिजे, सहानुभूती नको, पोकळ दिलासा नको. रडू नका तर लढा, असे आवाहनही पाटेकर यांनी केले. आपण प्रत्येक जण जातीवंत अ‍ॅटमबॉम्ब आहोत. अजून किती आत्महत्या षंढ समाज पाहणार आहे. असा उपक्रम करावसा वाटला याचं समाधान आहे. या समाधानाची तुलना कोणत्याही पुरस्काराशी होऊ शकत नाही. ही चळवळ पुरस्कारासाठी नाही. तुम्ही टाळ्या वाजवून चालणार नाही. खरं तर जगण्याची ही सुरूवात झाली. आज इतक्या वर्षांनंतरही शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नाही. गुरूजीचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार आज ३५ हजार झाला. सोन्याच्या किंमतीत ८२ पटीने वाढ झाली. पगार अडीचशे पटीने वाढले. परंतु, शेतकऱ्यांच्या मालाची किंमत फक्त आठ पटीने वाढली. आग लागण्याची वाट पहायची का, असा प्रश्नही पाटेकर यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमात अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी महाराष्ट्रभर उभ्या केलेल्या या चळवळीचा आढावा मांडला. ही सकारात्मक चळवळ असून माणसांनी माणसासाठी चालविलेली माणूसकीची चळवळ असल्याचे नमूद केले. या चळवळीच्या माध्यमातून एक कोटी वृक्ष लागवड करणार असून ग्रामसुधारणा मोहीम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी १० कुटुंबियांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश देण्यात आले. प्रास्तविक डॉ. प्रताप जाधव यांनी केले. आभार हरीष इथापे यांनी मानले.

 

Story img Loader