दूरचित्रवाहिनीवरून शेतकरी आत्महत्येची बातमी आली की मन व्यथित होते. या शेतकऱ्यांसाठी आपणही काही तरी मदत केली पाहिजे या जाणिवेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आम्ही कलाकार आलो आहोत. पसा कपाटात राहिला तर कागदाचे तुकडे असतात. इतरांच्या मदतीला उपयोगी आला तर त्याला किंमत आहे. सिनेमा, नाटकातील कामापेक्षा या कामाचे अधिक समाधान असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे हक्क त्यांना मिळवून द्यावेत, असे आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केले. राज्यकर्त्यांनी सुज्ञ होऊन थोडे माणसासारखे वागावे, अशी अपेक्षा व्यक्त करून शेतकरीच खरा हीरो असल्याने आत्महत्येचा विचार डोक्यातून काढा, अशी भावनिक साद अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी घातली.
बीड येथे रविवारी जालना रस्त्यावरील एलडीसी हॉलमध्ये आत्महत्याग्रस्त ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आíथक मदत देऊन सिनेअभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी थेट संवाद साधला. यावेळी नितीन नेरुळकर, लेखक अरिवद जगताप यांच्यासह प्रा. रवींद्र बनसोड व रामभाऊ शेळके आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मकरंद अनासपुरे यांच्या कल्पनेतून चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एकत्र येऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची चळवळ सुरू करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आम्ही शहरात राहत असलो तरी दूरचित्रवाहिनीवरून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वृत्त आल्यानंतर मन व्यथित होते. समाजासाठी आपणही काही देणे लागतो याची जाणीव होते. त्यातूनच मकरंद अनासपुरे याच्या कल्पनेतून सर्वानी एकत्र येऊन आमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन चतकोर भाकरी खाऊन तुम्हाला भेटण्याची इच्छा असली तरी यावेळी ती शक्य नाही. मात्र कोण मदत करते आणि कोण नाही, सरकार किती काम करते यावर टिकाटिप्पणी करण्यापेक्षा सर्वानी मिळून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पसा कपाटात राहिला तर तो कागदाचा तुकडा असतो. तो अडचणीतल्या माणसासाठी मदत म्हणून दिला तर त्याची किंमत वाढते, असे सांगून शेतकरी हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण एकमेकांना धीर दिला पाहिजे. आम्ही कलावंत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आत्महत्येचा विचार करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
मकरंद अनासपुरे यांनी राज्यकर्त्यांनी सुज्ञ होऊन थोडे माणसासारखं वागावे अशी अपेक्षा व्यक्त करत प्रत्येकाचा ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. आपल्या व्यवसायाला बिझनेस म्हणून पाहत आहेत. परंतु शेती व्यवसायाला कोणीच बिझनेस म्हणून पाहत नाही, ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करून शहरी भागाच्या संवेदना संपत जाणे हे अराजकतेचे लक्षण असल्याची भीती व्यक्त करून शेतकरी संघटित नाही, तो संप करत नाही. त्यामुळे त्याच्या प्रश्नाकडे कोणी पाहत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीची चळवळ गावागावापर्यंत पोहोचून ती लोकचळवळ व्हावी आणि समाजातील जागरुक तरुणांनी एकत्र येऊन ‘शेतकरी डे’ साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे गौतम खटोड यांनी १ लाख १२ हजार रुपयांचा निधी यावेळी नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ज्योती मोराळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्र शब्दातून मांडले. त्यावेळी उपस्थित नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनाही आपले अश्रू आवरता आले नाही.  बोलताना ही महिला चक्कर येऊनही कोसळली.
अभिनेत्यांमधला सजग माणूस
बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. दिग्गज राजकीय पुढाऱ्यांचा जिल्हा असला तरी सर्वच जण सरकारी मदत मिळवून देण्यासाठीच प्रयत्न करण्याचे आश्वासन देतात. मात्र भूमिपुत्र असलेल्या आघाडीचा अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी कलाकारांना एकत्रित करून एक चळवळ निर्माण केली. चित्रपटात नायकाच्या भूमिका करणारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे अडचणीतील माणसासाठीसुद्धा माणूस म्हणून धावून जातात आणि कोणताही अभिनिवेष न बाळगता सर्वसामान्यपणे लोकांमध्ये मिसळतात. रविवारी नाना पाटेकर यांनी थेट लोकांमध्ये जाऊन मदत देत संवाद साधला. तर अनासपुरे यांनी माईक हातात घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची नावे वाचली. दोन्ही दिग्गज अभिनेत्यांचा साधेपणा आणि त्यांच्यातील सजग माणूस दिसून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा