प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषण शैलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कौतुक केलं. फडणवीसांच्या भाषण शैलीचा किस्सा सांगताना नाना पाटेकरांनी कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे, असं वक्तव्य केलं. ते मंगळवारी (११ ऑक्टोबर) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर म्हणाले, “कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवार यांना आहे. गाण्यात लता दिदी आणि बोलण्यात अजित दादा हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही भाषणाची पूर्ण शैली बदलून टाकली आहे.”

“अरे बाबा किती जोराने बोलतो”

नाना पाटेकर यांनी फडणवीसांचा एक किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस भाषणात स्वर वरचा लावायचे असं नाना पाटेकरांनी सांगितलं. तसेच तो वरचा स्वर लावू नका असा सल्ला फडणवीसांना दिल्याचंही पाटेकरांनी नमूद केलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी होकार देत तो किस्सा सांगितला.

“माझ्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या भाषणातील आवाजाची तीव्रता कमी होण्याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांना जातं. मला जाहिरपणे सगळ्यांना सांगायचं आहे की, विधानसभा निवडणुकीच्या माझ्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा आणि म्हणायचे अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल.”

“भाषण शैलीतील बदलाचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांचं”

“मी त्यांना कबुल करायचो की तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका आणि भाषणाला उभा राहून पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नाना पाटेकरांचा फोन यायचा. मात्र, हळूहळू मी प्रयत्न करून ते बदललं आणि आत्ता मी ते पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांचं आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“नऊ महिन्यात १०९२ आत्महत्या झाल्या”

नाना पाटेकर म्हणाले, “तुम्ही विदर्भातील आहात. नऊ महिन्यात १०९२ आत्महत्या झाल्या आहेत. आपण किती सहजपणे बसतो आत्महत्यांची बातमी वाचतो आणि पुढचं पान उचकतो. या प्रश्नावर प्रत्येक सरकारने एकमेकांवर बोटं दाखवली आहेत. त्यावर जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. मुळात आपला शेतीप्रधान देश आहे. नंतर औद्योगिक क्रांती म्हणत अनेक बदल केले.”

हेही वाचा : “तुमच्या पत्नी म्हणाल्या त्यांना चांगलं…” अमृता फडणवीसांचं नाव घेत नाना पाटेकर असं काय बोलले की देवेंद्र फडणवीसांनाही फुटलं हसू

“आपल्याकडे एमआयडीसीही सुपिक जागेवरच होतात”

“आपल्याकडे एमआयडीसीही सुपिक जागेवरच होतात. जिथं रेताड जागा आहेत तिथं एमआयडीसी करायला हव्यात. म्हणजे तिथल्या जागेचाही वापर होईल आणि तेथेही पायाभूत सुविधा तयार होतील. पारंपारिक शेती करताना आम्हाला ती परवडत नाही. हमीभाव नाही, मी कुठलं पीक लावलं पाहिजे हे सांगणारे बाजार अभ्यासक नाहीत, ” असंही यावेळ नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar praise ajit pawar for speech in front of eknath shinde devendra fadnavis pbs