उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागील विधानसभा निवडणुकीतील भाषणं त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चांगलीच चर्चेत होती. त्यावर अनेक मीम्सही तयार झाले. यावरूनच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी फडणवीसांचा एक किस्सा सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस भाषणात स्वर वरचा लावायचे असं नाना पाटेकरांनी सांगितलं. तसेच तो वरचा स्वर लावू नका असा सल्ला दिल्याचंही नमूद केलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी होकार देत तो किस्सा सांगितला. ते मंगळवारी (११ ऑक्टोबर) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या भाषणातील आवाजाची तीव्रता कमी होण्याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांना जातं. मला जाहिरपणे सगळ्यांना सांगायचं आहे की, विधानसभा निवडणुकीच्या माझ्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा आणि म्हणायचे अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल.”

“मी पुढचं भाषण ऐका म्हणायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो”

“मी त्यांना कबुल करायचो की तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका आणि भाषणाला उभा राहून पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नाना पाटेकरांचा फोन यायचा. मात्र, हळूहळू मी प्रयत्न करून ते बदललं आणि आत्ता मी ते पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांचं आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा

“गाण्यात लता दिदी आणि बोलण्यात अजित दादा”

फडणवीस यांच्या उत्तरावर नाना पाटेकर म्हणाले, “कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवार यांना आहे. गाण्यात लता दिदी आणि बोलण्यात अजित दादा हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही भाषणाची पूर्ण शैली बदलून टाकली आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar recall incident of devendra fadnavis high volume speech during election pbs
Show comments