Nana Patekar on Politics: अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. राजकीय वा सामाजिक मुद्द्यांवर नाना पाटेकर परखड भूमिका मांडतात. अनेकदा त्यांनी मांडलेल्या भूमिका चर्चेचा विषयही ठरलेल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकारणाबाबत मांडलेली भूमिका अशीच चर्चेत येण्याची शक्यता आहे. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकारणावर बोलताना नाना पाटेकरांनी उद्विग्न शब्दांत टीका केली आहे. तसेच, राजकारणात सुधारणा करण्याची जबाबदारी मतदारांचीही असल्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझं शरीर हे माझं शस्त्र आहे. ते नीट नसेल, तर कसं चालेल. आपण गाडी कशी व्यवस्थित ठेवतो आपली. ज्यांना व्यायामशाळेत जाता येत नाही, त्यांनी नियमित बैठक आणि सूर्यनमस्कार केलं पाहिजे. मी अजूनही जिममध्ये आरश्यात व्यायामानंतर स्वत:चं शरीर बघतो”, असा संदर्भ देत नाना पाटेकर यांनी आरश्यात पाहताना प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे, पण राजकीय मंडळींनी त्यांच्या घरातले आरसे फोडून टाकले असावेत, असं विधान केलं.

“आरश्यात स्वत:ला पाहून किळस वाटली तर…”

“आपल्याला आपण आवडलो तर जगण्याची गंमत वेगळी आहे. आपण आपल्याला आवडायला पाहिजे. मग बाकीचं सगळं आवडतं. मला मी आवडलो पाहिजे. आरश्यात बघताना स्वत:ची किळस आली तर जगण्याची गंमत संपली. मला वाटतं हल्लीच्या राजकारणातल्या खूपशा मंडळींनी आपल्या घरचे आरसे फोडून टाकले आहेत. कधीतरी चुकून तहान लागली असताना पाणी पिताना पाण्यात बघतील, तेव्हा ते प्रतिबिंब पाहिल्यानंतर त्यांना प्रश्न पडेल की ‘अरे आपलं माकड कधी झालं?’. यांना कळत कसं नाही? मरणार आहेत एक दिवस. जाणार आहात तुम्ही एक दिवस”, असं नाना पाटेकर म्हणाले.

नाना पाटेकर यांचं मतदारांना आवाहन…

“त्यांनी आरसे फोडलेही असतील. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना पुन्हा नव्याने आरसे दाखवायला पाहिजेत. ते आपल्या हातात आहे. आपण मत दिल्यानंतर ५ वर्षं काहीही करता येणार नाही असं आपल्याला वाटतं. असं नाहीये. जेव्हा जेव्हा कुठे विसंगती दिसली की तिथे जा. जाळपोळ करा, गाड्या तोडा असं नाही. पण तिथे जा आणि त्यांना प्रश्न विचारा. जनतेला घाबरणं त्यांचं थांबलंय. त्यांनी जनतेला पुन्हा घाबरायला पाहिजे. ते ज्या दिवशी सुरू होईल, त्या दिवशी हे भवताल बदलेल. राजकीय, सामाजिक असा सगळाच भवताल बदलेल”, असं आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केलं.

Nana Patekar: “मी आईला विचारलं हिंदू आणि मुस्लीम यांच्यात फरक काय? तर आई म्हणाली…”, नाना पाटेकरांनी सांगितली ‘ती’ आठवण!

“तरुणांकडून खूप अपेक्षा आहे. राजकारण्यांना तुम्हाला वापरू देऊ नका. ते चुकत असतील तर त्यांना जागेवर आणा. ही तुमची जबाबदारी आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar slams maharashtra politics amid vidhan sabha election results pmw