दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाचे पैसे शेतकऱ्यांकडे वळवता येणार नाही का, असा प्रश्न अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी एका कार्यक्रमात उपस्थित केला. शेतकऱ्यांना पैसे दिल्याने सरकारी तिजोरीवर असा किती भार पडणार आहे, असेही त्यांनी विचारले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर गावात हॅलो मेडिकल फाऊंडेशन व नाम या संस्थेच्यावतीने सोमवारी एकल महिला मेळावा व शेतकरी कुटुंबाला मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी हे प्रश्न उपस्थित केले.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारने लागू कराव्यात. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केली. हमीभावाची मागणी मान्य केली, तरी शेतकरी समृद्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काहीवेळा वेगळे निर्णय घेणे हे जास्त महत्त्वाचे असते, याकडेही सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
या कार्यक्रमात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला व गरजू विद्यार्थ्यांना शेळ्या, सायकल व शिलाई मशीनचे वाटप नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Story img Loader