जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर गंभीर आरोप केला आहे. जालन्यातील मराठा आंदोलकरांवरील लाठीचार्जच्या घटनेला पोलीस नाहीतर सरकार दोषी आहे. सरकारने कोणत्या आधारावर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जालना घटनेबाबत पोलीस अधिक्षकांचं निलंबन करत कारवाई झाली पाहिजे का? असा प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “यात पोलीस अधिक्षकांचा काय दोष? सरकारने सौम्य लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला.”

हेही वाचा : “गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, आमचीही…”; उद्धव ठाकरेंची जालन्यात मागणी

“पण, कोणत्या आधारावर सरकारने लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला? या घटनेला पोलीस नाहीतर सरकारच दोषी आहे. सरकारवर कारवाई व्हावी. सरकारने पायउतार व्हावं. अन्यथा जनता त्यांना खुर्चीतून खाली खेचेल,” असं नाना पटोलेंनी म्हटलं.

“धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणाचं खोटं आश्वासन देऊन २०१४ साली फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं. ५० टक्के आरक्षणांची मर्यादा वाढवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. पण, मोदी सरकारला कोणाचेही भलं करायचं नाही. ओबीसींचं आरक्षण मराठा समाजाला देण्याचं काम चालू आहे. त्यातून मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं पाप भाजपा करत आहे. दोन समाजात भांडण लावून पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे,” अशी टीका नाना पटोलेंनी केली.

हेही वाचा : फेरविचार, क्युरेटिव्ह याचिकांच्या कारणास्तव मराठा आरक्षणासाठी दोन वर्षे वाया

“मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा वणवा महाराष्ट्रात पसरला आहे. ही घटना मराठवाड्यातील असल्याने तेथील जनसंवाद यात्रा थांबवण्यात आली आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole allegation shinde fadanvis govt over police beat maratha protester in jalna ssa