अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. तसंच, महाआघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही टीकास्त्र सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“प्रफुल्ल पटेलांना नरेंद्र मोदी आणि अमित शआह स्पीच तयार करून देतात, असा मिश्किल टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. “मोदी-शाह सांगतील तसं प्रफुल्ल पटेलांना बोलावं लागतं. नाही बोललं तर फॉर्म्युला ठरलेला आहे. सत्तेत या नाहीतर जेलमध्ये जा”, असा आरोपही नान पटोलेंनी केला आहे.
हेही वाचा >> “भाजपा म्हणजे राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर” संजय राऊत यांची घणाघाती टीका
“हे लोक कशासाठी गेले आहेत, त्याचं आलेखन पवारांनी त्यांच्या प्रेसमध्ये केलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया कोणाकोणावर चालल्या आहेत हे त्यांनी वाचून दाखवलं. मोदी आणि शाह जेवढं सांगतात त्यापलिकडे काहीही करता येणार नाही”, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.