Bunty Shelke on Nana Patole: संघ मुख्यालयासमोर प्रियांका गांधी वाड्रा यांची प्रचार मिरवणूक घेणारे आणि भाजपा कार्यालयात प्रचार करून चर्चेत आलेले काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून ११,६३२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने १०१ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळू शकला. काँग्रेसचा ८५ जागांवर झालेल्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत आहेत. तसेच नाना पटोले संघाशी जोडलेले आहेत, असा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिलेले बंटी शेळके यावेळी विजयाचे दावेदार समजले जात होते. २०१९ साली त्यांनी निवडणूक लढविली होती, त्यावेळी त्यांचा केवळ चार हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी विजय नक्की मिळवू या उत्साहात ते प्रचाराला लागले होते. यासाठी त्यांनी प्रचारादरम्यान भाजपा कार्यालयात जाऊनही प्रचार केला. प्रियांका गांधी वाड्रा या नागपूर मध्यमध्ये प्रचारासाठी आल्या असता त्यांना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली होती. प्रचारात आघाडी घेऊनही केवळ काँग्रेस संघटनेच्या उदासीनतेमुळे आपला पराभव झाला असल्याचे बंटी शेळके यांनी म्हटले आहे.

हे वाचा >> काँग्रेस विस्ताराची जबाबदारी पुन्हा विदर्भावर; जिंकलेल्या १६ पैकी नऊ जागांचा समावेश

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना बंटी शेळके म्हणाले, आज मुंबई येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत मी नाना पटोले यांची तक्रार केली असल्याचे बंटी शेळके म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत जर विजय मिळवायचा असेल तर काँग्रेस नेतृत्वाने आताच यात लक्ष घालून नाना पटोले यांना बाजूला करायला हवे किंवा त्यांना समज द्यायला हवी, अशी मागणीही बंटी शेळके यांनी केली.

हे ही वाचा >> BJP Crisis : निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?

नाना पटोले यांचे संघाशी संबंध

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचाही आरोप बंटी शेळके यांनी केला. ते म्हणाले, मी टिळक भवनासमोर उभा राहून सांगतोय की, नाना पटोले यांचे आजही संघाशी संबंध आहेत. माझ्या मतदारसंघात प्रियांका गांधी वाड्रा आलेल्या असतानाही काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तिथे आले नाहीत. प्रियांका गांधी वाड्रा या फक्त शेळकेसाठी प्रचार करायला आल्या नव्हत्या. त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. पण माझ्यासाठी काँग्रेसची संघटना प्रचारात उतरली नाही.