Mahavikas Aghadi: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर काही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली तर काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, आता महाविकास आघाडीतील काही उमेदवारांच्या नावात बदल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात मोठं विधान केलं आहे.
‘महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या उमेदवारांच्या एखाद्या दुसऱ्या जागेच्या नावात एडिटिंग (बदल) होऊ शकते’, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या यादीत काही बदल होतील, असं नाना पटोलेही म्हणाले आहेत. त्यामुळे आता नेमकी कोणत्या उमेदवारांच्या नावात बदल होणार आहेत, याबाबात तर्कवितर्क लावले जात आहेत.
नाना पटोले काय म्हणाले?
“आमची चर्चा सुरु आहे. उमेदवारांच्या यादीत काहीतरी बदल होतील. काही बदल झालेले आपल्या समोर येतील. मात्र, किती जागात बदल होतील हा आकडा आत्ता सांगता येणार नाही. आज सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमेटीची बैठक होणार आहे. जवळपास ४० जागांवर चर्चा होईल. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या हायकमांडबरोबर चर्चा होणार असून त्यानंतर बरेच बदल झालेले पाहायला मिळतील”, असं सूचक विधान नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं. तसेच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज संध्याकाळपर्यंत येणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.
संजय राऊत काय म्हणाले?
“महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या उमेदवारांच्या एखाद्या दुसऱ्या जागेबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते. एखाद्याच्या नावात एडिटिंग (बदल) होऊ शकते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आमच्या एखाद्या दुसऱ्या जागेबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते. रामटेकच्या जागेवर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे काय करायचं ते आम्ही निर्णय घेणार आहोत”, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.