Sanjay Raut and Nana Patole : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या बैठकांचा धडाका सुरु आहे. लवकरच जागावाटपही जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. यावरून नाना पटोले आणि संजय राऊत हे आमने-सामने आले होते. मात्र, यानंतर आज (१९ ऑक्टोबर) मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भातील एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नाना पटोले आणि संजय राऊत हे दोघे एकत्र दिसले. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद मिटल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, यावेळी नाना पटोले आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात १० हजार मतांची फेरफार सुरु असून या षडयंत्राचे प्रमुख भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील मतदारांची नावे कट करून दुसऱ्या राज्यातील लोकांची नावे जोडण्यात येत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच वेळ पडल्यास आम्ही निवडणूक आयोगावर मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.
हेही वाचा : “तुम्ही बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो की…”; अजित पवारंचं लाडक्या बहिणींसाठी खास आवाहन!
संजय राऊत काय म्हणाले?
“आमच्याकडे खूप गंभीर काही माहिती आहे. देशातील निवडणुका निष्पक्ष घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मात्र, त्या अधिकाराचे उल्लंघन सुरु आहे. निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ शकत नाही, आपण सत्ता गमावत आहोत, या भितीने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हे मोठं कारस्थान लोकशाही विरोधात रचलं आहे. त्यासंदर्भात एक महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगालाही भेटले आहेत. काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत. त्यासाठी विशेष अॅपची निर्मिती करून प्रत्येक मतदारसंघात किमान १० हजार मते त्यामधून काढून टाकायची आणि तेवढी मते त्या ठिकाणी दुसरे बाहेरील राज्यातील टाकण्याचे कारस्थान समोर आलेलं आहे. १५० मतदारसंघात हा घोळ सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपाच्या टीम या कामाला लागल्या आहेत. याचे सुत्रधार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं मला दिसत आहे. या राज्याच्या भविष्याचा हा मुद्दा आहे. मात्र, आम्ही हे षडयंत्र उधळून लावू आणि वेळ पडली तर निवडणूक आयोगावर मोठा मोर्चा काढू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
नाना पटोले काय म्हणाले?
“ज्या प्रमाणे संजय राऊत यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील काही मतदारांची नावे कट करून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील काही मतदारांची नावे त्यामध्ये टाकून १०, १० हजार नावे जोडली जात आहेत. त्यामध्ये राज्यातील काही अधिकारी सहभागी झाले आहेत. आम्ही याची माहिती निवडणूक आयोगाला दिली. त्यामुळे ही सर्व व्यवस्था तातडीने दुरुस्त करावी, असं आम्ही आवाहन केलं आहे. निवडणुकीत पारदर्शकता आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पण हे महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. भाजपा महाराष्ट्राच्या लोकांचं गळा घोटण्याचं काम करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही सूचित करत आहोत की हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु झालं आहे, हे थांबलं पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले.