काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता वर्तवली जात. कांग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते लवकरच उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची पुष्टी झाली आहे. या नेत्यांसह राहुल गांधी देखील उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाऊ शकतात. राहुल गांधी यासाठी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी मग महाराष्ट्रात पाऊल ठेवावं, अन्यथा राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
दरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याच्या शक्यतेबाबत आणि त्यांच्यावर भाजपाकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाला गांधी नावाची भिती वाटते. मी सावरकर नाही तर गांधी आहे असं बोलणं जर गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्हाला मान्य आहे. जनतेची दिशाभूल करणं आणि खोटा प्रचार करणं एवढीच कामं भाजपाकडून राज्यात होत आहे. कारण राहुल गांधींना ते घाबरू लागले आहेत.
पटोले म्हणाले की, मुळात गांधी या नावातच दम आहे, या नावाला घाबरून इंग्रजही पळाले. मी सावरकर नाही गांधी आहे या वाक्याचा तुम्हाला काय त्रास आहे. जनतेच्या मुख्य प्रश्नांवरून दिशाभूल करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. लोकांची दिशाभूल करून नव्या वादांचा तमाशाच यांनी सुरू केला आहे.
हे ही वाचा >> भाजपाकडून तुम्हाला ऑफर आहे का? खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” पंतप्रधान मोदींनी लोकसभेत…”
महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावू नका
पटोले म्हणाले. भाजपवाले हल्ली जे काही बोलतात ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, गुजरातची असेल तर मला माहिती नाही. परंतु महाराष्ट्रात ही संस्कृती आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लावला तर यांची काय हालत होईल ते यांनी पाहावं. मी त्यांच्यासारखा धमकावत नाही. परंतु महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावू नका एवढची माझी विनंती आहे. माझं यांच्याप्रमाणे चॅलेंज नाही विनंती आहे.