राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांसाठी अद्याप पावलं उचललेली नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. आमदार पटोले म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे, परंतु अद्याप त्यासंबंधी सर्वेक्षण झालेलं नाही. शेतकरी आणि जनतेसमोर एकीकडे अस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणांमागून घोषणा देत आहे. ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे, परंतु, अंमलबजावणी मात्र शून्य आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, नाना पटोले यांनी विधीमंडळाबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी नाना पटोले म्हणाले की, सरकार वर्षभरापासून केवळ पोकळ घोषणा देत आहे. जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. या सरकारवर शेतकरी व जनतेचा विश्वास राहिलेला नाही. राज्यात सरकार आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे. प्रशासनात अनागोंदी सुरू असून जनतेला लुबाडलं जात आहे.
नाना पटोले म्हणाले, मुंबईसह राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत, सर्व रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य आहे, या खड्डयांमुळे वाहतूक कोंडी होत असून यामुळे अपघातही होत आहे. या अपघातांमध्ये लोकांचे नाहक बळी जात आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झालं? असा संतप्त प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. राज्याची समृद्धी करायला निघालेल्या सरकारने समृद्धी महामार्ग हा मृत्यूंचा सापळा बनवला आहे. विधानसभेत सरकारला प्रश्न विचारले तर मंत्री स्पष्ट उत्तरे देत नाहीत, तपासू, बघू, पाहू अशी उत्तरे दिली जात आहेत.
हे ही वाचा >> रक्षकच झाला भक्षक! मणिपूरमध्ये BSF जवानाकडून स्थानिक महिलेबरोबर अश्लील कृत्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंदर्भात नियमावली आहे. रस्त्यावर खड्डे असतील तर टोल घेतला जात नाही पण राष्ट्रीय महामार्गांवर खड्डेच खड्डे असताना टोल वसुली केली जात आहे. टोलमाफियांचे राज्य असून सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. टोल माफिया सरकारचे जावई आहेत का? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.