नागपूर येथील महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार आहे. तेथील सभा होऊ नये, यासाठी भाजपाने प्रयत्न केला. त्यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“भाजपा विरोधातील सगळे लोक एकत्र येत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजक करण्यात आलं आहे. भाजपा विरोधात मोट बांधण्याच काम सुरू आहे. देश वाचवण्यासाठी काँग्रेस काम करत आहे,” असे नाना पटोलेंनी सांगितलं.
हेही वाचा : “बंटी पाटील ९६ कुळी पाटील नव्हे, तर…”, धनंजय महाडिकांची घणाघाती टीका
“महागाई वाढली असून, सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण, सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. तुम्हाला जनतेने लुटण्यासाठी किंवा तोडफोडीचे राजकारण करण्यासाठी बसवलं नाही. तर, सर्व सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी बसवलेलं आहे. त्यावर चर्चा केली पाहिजे,” असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा : “राहुल गांधींनी माफी मागावी, मगच…”, ‘त्या’ प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
“आपण हिंदुस्थानात राहतो. त्यामुळे हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपाने सांगावा. तसेच, भाजपा ज्यांना मानते, त्यांच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती, ते त्यांनी स्पष्ट करावे. भाजपा सातत्याने लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे,” अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.