Nana Patole : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, असे प्रश्न उपस्थित करून विरोधक आरोपीचं समर्थक करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपालाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच या प्रकरणातील एकाला नाही, तर इतर आरोपींनाही अटक करून त्यांचा एन्काऊंटर करा, आम्ही त्याचे समर्थन करून असं आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले नाना पटोले?

“महाराष्ट्रातील सरकार पापी आहे. स्वतःचे पाच दुसऱ्यांवर कसे ढकलायचं हे त्यांना माहिती आहे. हे लोक सगळं ठरवून करत आहेत. आम्ही जे काही बोललो किंवा सोशल मीडियावर पोस्ट केली, ते बघितलं तर अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर जे प्रश्न निर्माण झाले, ते फक्त आम्ही विचारले आहेत. सरकार त्यावर उत्तर न देता, पळवापळवीची उत्तर देत आहे. स्वतःचं पाप दुसऱ्यांवर ढकलण्याचा हा प्रकार आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा – “विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस महासंचालकांची हकालपट्टी करा”, नाना पटोलेंची मागणी; म्हणाले…

“सरकारकडून शाळेच्या संचालक मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न”

“लोकांना हे सगळं कळतं आहे. अक्षय शिंदेचं समर्थन कोणीही केलेलं नाही, करणारही नाही. खरं तर न्यायालयात संबंधित शाळेसंदर्भात कोणीतरी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत या शाळेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या शाळेत मुलींचे व्हिडिओ बनवले जात होते, अशी देखील माहिती आहे. हे सगळं भयानक आहे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना, या प्रकरणातील शाळा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. त्यामुळे तिथल्या संचालक मंडळला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. या घटनेतील मुख्य आरोपी वेगळे आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.

“याप्रकरणातील इतर आरोपींचाही एन्काऊंटर करा”

“बदलापूरची घटना ही राज्यातील एकमेव घटना नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये यापेक्षा भयंकर घटना घडल्या आहेत. राज्यात महिला अत्याचाराची कीड या सरकारमुळे लागली आहे. त्यामुळे सरकारने आमच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वत: आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणाचे समर्थन कुणीही करत नाही. जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याची उत्तरं सरकारे दिली पाहिजे. सरकारने याप्रकरणातील इतर आरोपींनाही अटक केली पाहिजे, सरकारने त्यांचाही एन्काऊंटर करावा, आम्ही त्याचे समर्थन करू”, असेही ते म्हणाले.