खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. शिंदे गट, भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. असे असतानाच आता भारत जोडो यात्रेदरम्यान, सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच प्रश्नाचे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा मुद्दामहून काढला नव्हता, असे नाना पटोले म्हणाले. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा >>> आधी आदित्य ठाकरे म्हणाले “…म्हणून टेंडर रद्द केले का?” आता नितेश राणेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले “उद्धव सेनेतील युवराजांची…”
“राहुल गांधी काँग्रेसचा विचार घेऊन चालले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रलोभनांना बळी पडले. त्यामुळे ते वाचले. त्यांना ६० रुपये पेन्शन मिळाले. यापेक्षा जास्त प्रलोभनं भगवान बिरसा मुंडा यांना देण्यात आली होती. मात्र देशाच्या मातीशी आणि जनतेशी घोकाधडी करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे वयाच्या २४ व्या वर्षी ते शहीद झाले. याच मुद्द्याला घेऊन राहुल गांधी यांनी तो विषय काढला होता. राहुल गांधी यांनी मुद्दामहून तो विषय काढला नव्हता. राहुल गांधी यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली होती. त्यामुळे एवढी चिंता करण्याची गरज नाही, असे नाना पटोले म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतही त्यांनी भाष्य केले. आम्ही आमचा विचार चालवत आहोत. त्यामुळे कोणाला काही वाटत असेल तर त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> “त्यांनी आपली जीभ…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया!
राहुल गांधी महाराष्ट्रात सहा सभा घेणार आहेत. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रासाठी आमची रणनीती तयार झालेली आहे. महाराष्ट्रातील जनता ही नेहमीच काँग्रेससोबत राहिलेली आहे. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपापल्या भागात येऊन सभा घ्यावी, अशी लोकांची इच्छा आहे. लोकांची हीच इच्छा आम्ही पूर्ण करत आहोत,” असेही नाना पटोले म्हणाले.