राज्यात लवकरच सत्ताबदल होईल आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होईल, अशा दावा महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांकडून अधून मधून होताना दिसतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोघे सातत्याने महाविकास आघाडी आणि आगामी मुख्यमंत्री यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसतात. माध्यमांकडूनही या दोघांकडे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत सतत प्रश्न विचारले जातात. अशातच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असा दावा खासदार राऊत यांनी अलिकडेच केला आहे. तर महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले अलिकडेच एका मुलाखतीवेळी म्हणाले की, कोणत्याही कारणामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. काँग्रेसचा हा प्लॅन बी काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, पटोले यांनी रविवारी (७ मे) रात्री याविषयीची भूमिका स्पष्ट केली. काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी पटोले यांना काँग्रेसच्या प्लॅन ‘बी’विषयी विचारल्यावर पटोले म्हणाले, विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “आतापर्यंतची जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो. ही आतापर्यंतची लोकशाहीची परंपरा आहे.” यावेळी पटोले यांना काँग्रेसच्या प्लॅन ‘बी’विषयी विचारल्यावर पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आम्ही सतर्क आहोत. त्या धोक्यामुळे महाविकास आघाडीत ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील, ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा काँग्रेस सतर्क असेल.

हे ही वाचा >> “साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष कर्नाटकात काय डोंबलं…”, देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला, म्हणाले…

नाना पटोले म्हणाले, हे सगळे निर्णय त्या-त्या वेळी घेतले जातील. परंतु आज काँग्रेस पक्ष म्हणून, पक्षाचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की, माझा पक्ष प्रत्येक ठिकाणी उभा असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे आणि मी ते करतोय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole congress is alert for maha vikas aghadi seat sharing formula and next cm asc
Show comments