नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेच्या उमेदवारीवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरुन भाजपावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. “पाचही जागांबाबत स्पष्टीकरण यावे, यासाठी आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यावेळी पाचही जागांबाबत चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत कुणाचा पराभव होणार हे ३० तारखेला मतदानाच्या दिवशी ठरेल. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल २ फेब्रुवारी रोजी लागणार आहे, तेव्हा सर्वांना कळून येईलच”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नाना पटोले यांनी यावेळी भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भाजपाने घर फोडण्याचं काम केलं आहे. घर फोडणं ही त्यांची आता परंपराच झाली आहे. नाशिकमध्ये त्यांना स्वतःचा उमेदवार मिळू नये, यावरुन भाजपाची काय स्थिती झाली, हे लक्षात येतं. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सुशिक्षित लोक मतदान करत असतात. राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. सुशिक्षित लोक मतदानातून याबाबत भाजपाला उत्तर देतील.”
अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी जी २० ची परिषद झाली तेव्हा मुंबईला सजविण्याचे काम झाले. विमानतळाच्या आजूबाजूला झोपडपट्टी झाकण्यासाठी मोठ मोठे बॅनर लावले होते. त्यावर नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटनाला येत आहेत. पण आठ वर्षांपूर्वी त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केले होते, त्या प्रकल्पाचे काय झाले? यावर बोलले पाहीजे.
आधी गुजरातवरुन उद्योग आणावेत
दावोसला अनेकदा आपले नेते गेले आहेत. त्यामुळे तिथून किती गुंतवणूक येते, हे सर्वांनात माहीत आहे. तिथे एक लाख कोटीचे करार केले काय किंवा दहा लाख कोटींचे करार केले काय, त्याला काहीच अर्थ नसतो. उलट गुजरातला गेलेले उद्योग आणि रोजगार सत्ताधाऱ्यांनी आणून दाखवावेत.