प्राप्तिकर विभागाकडून आज बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईनंतर विरोधकांकडून मोदी सरकार जोरदार टीका करण्यात येत आहे. बीबीसीने गुजरात दंगलीबाबत माहितीपट प्रकाशित केल्यामुळेही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा – “देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात, अदाणींचं पाप…” BBCवरील कारवाईवरून अमोल मिटकरींचं मोदी सरकार टीकास्र!
काय म्हणाले नाना पटोले?
प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर नाना पटोले यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. बीबीसीने पंतप्रधान मोदींवर एक माहितीपट बनवला आणि लगेच बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडू लागले. ५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं, असं ते म्हणाले.
बीबीसीवरील कारवाईवरून काँग्रेस आक्रमक
तत्पूर्वी या कारावाईवरून काँग्रेसनेही मोदी सरकारवर टीकास्र सोडलं होतं. “अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे”, असं ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा – BBC Income Tax Raid : BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर धडकले प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, नेमकं कारण काय?
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर भारतात बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली होती. अशातच आता बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्याने मोदी सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.