शिवसेनेकडून १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ही सगळी स्क्रिप्ट दिल्लीत बसलेल्या सरकारची असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
आमदारकी रद्द होण्याची शक्यता अधिक
आमदारांवर पक्षांतर्गत विरोधी कायद्याच्या आधारे जी कारवाई केली जाते त्यानुसार आमदारकी रद्द होण्याची शक्यता अधिक आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान नेमके काय अधोरेखीत केले आहे, ते जाणून घेतल्यानंतरच योग्य प्रतिक्रिया देणार असल्याचे पटोले म्हणाले.
पुढील सुनावणी ११ जुलैला
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंडखोर करणाऱ्या आमदारांच्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरी यांना नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना ५ दिवसांमध्ये आपली बाजू मांडणारं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ११ जुलैची तारीख दिली आहे.
३९ आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्ता यांची हानी होणार नाही याची काळजी
सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना विधीमंडळ, शिवसेनेचे प्रतोद आणि बंडखोर शिंदे गट अशा तिन्ही पक्षकारांना आपापलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस दिली आहे. तसेच या याचिकेची पुढील सुनावणी ११ जुलैला निश्चित केली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने यावेळी महाराष्ट्र सरकारला ३९ आमदार, त्यांचे कुटुंबीय व मालमत्ता यांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.