सोलापूर : आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हे उभे राहावेत अशी तमाम पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर सुशीलकुमार निवडणुकीत उभे राहतीलही. पण त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल. अशी हमी घेणार नसाल तर अशा ज्येष्ठ नेत्याचा मी अपमान होऊ देणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमारांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
रविवारी दुपारी हुतात्मा स्मृतिमंदिरात काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. त्यावेळी पटोले बोलत होते. या मेळाव्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीमखान, असलम शेख, भाई जगताप, मोहन जोशी, आमदार प्रणिती शिंदे आदींची उपस्थिती होती.
नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झालेल्या या निर्धार मेळाव्यात पटोले यांनी पक्षात घेतलेली पदे ही केवळ लेटरपॅडपुरती नाहीत तर पक्षाचे काम करण्यासाठी दिली आहेत. प्रभागापासून ते विभाग, तालुका पातळीपर्यंत पदाधिकारी निवडले जात असताना पदे घेऊनही नंतर पक्षासाठी वेळ देता येत नसल्यास उपयोग होणार नाही. हे यापुढे अजिबात चालणार नाही, अशा शब्दांत इशारा दिला.
पटोले यांच्या भाषणाच्यावेळी कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून उमेदवारी द्या म्हणून गलका केला. त्याची दखल घेत पटोले यांनी, तुमची इच्छा असेल तर सुशीलकुमारांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळेलही. पण त्यांना बहुमताने निवडून आणण्याची शाश्वती देणार नसाल तर अशा नेत्याचा पुन्हा अपमान होऊ देणार नाही, असे सुनावले आणि सुशीलकुमारांच्या उमेदवारीचे संकेतही दिले. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी केवळ सोलापूरच नाही तर माढा मतदारसंघही जिंकायचा आहे, असा निर्धार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी, दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले.
काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. अगोदरच्या नोटाबंदीसह करोना काळातील टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असताना आता दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेताना मोदी सरकारच्या गोंधळ दिसून येतो. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर बदलत चाललेल्या राजकीय वातावरणात मोदी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. केंद्रीय कायदामंत्र्याला बदलणे हे त्याचेच द्योतक आहे, असेही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. सुशीलकुमार शिंदे बाळासाहेब थोरात, नसीम खान आदींची या मेळाव्यात भाषणे झाली.
भाजपाचा माजी शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये
भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पक्ष प्रवेश देऊन स्वागत केले. आपण अटलबिहारी वाजपाईंच्या विचारांनी प्रभावित होऊन ३५ वर्षांपासून भाजपला वाहून घेतले होते. परंतु भाजप आता आटलबिहारींच्या विचारांचा राहिला नाही. गटबाजीने पक्ष पोखरला आहे, असे मनोगत प्रा. निंबर्गी यांनी मांडले.