Nana Patole : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. मात्र, महायुतीला बहुमत मिळून देखील अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. सध्या महायुतीच्या नेत्यांकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपाच्या नेत्यांकडून सांगितली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी देखील सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असतानाही नेमकं मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, निकालानंतर महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी एवढा वेळ का लागला? यावरून विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. पण गृहखातं देण्यास भाजपाने विरोध दर्शविला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही चर्चा आहे. मात्र, नाराजीच्या चर्चा शिवसेना शिंदे गटाकडून फेटाळण्यात आल्या आहेत. तसेच एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे ते रुग्णालयात देखील दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे त्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली.
हेही वाचा : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीरसिंह बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थराररक Video आला समोर
यातच अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते, अशीही चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी पाहता आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर टीका करण्यात येत आहे. तसेच बहुमत मिळून देखील सरकार स्थापन होण्यास उशीर होत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. “भाजपा काय आहे हे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता कळेल”, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडा झाला. पण अद्यापही सरकार स्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे विरोधकांकडून महायुतीवर टीका होत आहे. यावर बोलताना आता नाना पटोले यांनी देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली. नाना पटोले यांनी म्हटलं की,”मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भारतीय जनता पक्ष काय आहे हे आता कळेल आणि आता ते कळायला सुरुवात झाली”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd