शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जातात. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांविरोधात बोलायचं असेल, तर लिहून दिलं जातं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “भाजपा लिहून देते, तसं अजित पवारांना बोलावं लागणार. शरद पवार सांगतात, ‘ईडीमुळे हे लोक सरकारबरोबर गेले आहेत.’ हे बोलले नाहीतर, ईडी आपल्यावर कारवाई करेल. म्हणून भाजपाने लिहून दिल्यानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बोलावं लागते.”
हेही वाचा : “आता त्यांचं तोंड उघडत नाही”, अजित पवारांचा उल्लेख करत गुलाबराव पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला
“काँग्रेसमधून कोणीही बाहेर पडणार नाही”
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अजूनही काही लोक प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं, “लहान कार्यकर्त्यांचा हा प्रश्न होता. मुंबई विभागीय अध्यक्षांबरोबर माझी चर्चा झाली नाही. काँग्रेसमधून लोक बाहेर जातात, ही भाजपाकडून अफवा पसरवली जाते. असं काहीही होणार नाही.”
हेही वाचा : “मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांना थेट आव्हान?
“देशात काँग्रेसशिवाय पर्याय नाही”
“दिल्ली-द्वारका महामार्गासाठी १८ हजार कोटींऐवजी फक्त २५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. देशातील अनेक महामार्गांची कामे झाले असून, त्याच किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल? त्यामुळे सतत काँग्रेसवर टीका केली जाते. पण, जेवढी टीका करतील, तेवढा फायदा काँग्रेसला होणार आहे. देशात काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं लोकांना कळलं आहे,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.