Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडल्यानंतर आता निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात नेमकी कोणाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार? जनतेचा कौल नेमकी काय असणार? या प्रश्नांची उत्तरं आता २३ नोव्हेंबर रोजी निकालानंतर मिळतील. मात्र, असं असलं तरी निकालाच्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता स्थापनेबाबत दावे करण्यात येत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आमचंच सरकार स्थापन होईल असा दावा करत आहेत, तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडूनही दावा करण्यात येत आहे.
यातच मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलने राज्यात महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षाची मदत लागू शकते. त्यामुळे नेमकी सरकार कोण स्थापन करणार? हे रविवारी स्पष्ट होईल. असं असलं तरी निकालाच्या आधी मुंबईत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे महायुतीच्या बैठकांचा धडाका सुरु आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. काल मुंबईत खासदार संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे निकालाच्या आधी मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असून पडद्यामागे नेमकी काय घडतंय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा : महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?
यातच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल मुंबईत झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी या बैठकीला दांडी का मारली? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर आज नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. मात्र, याचवेळी नाना पटोले यांनी केलेल्या एका मिश्किल विधानाची मोठी चर्चा सध्या सुरु आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
दरम्यान, निकालाच्या आधाची महाविकस आघाडीतील नेत्यांच्या मुंबईत बैठका सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही देखील मुंबईला जाणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी नाना पटोले यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले यांनी म्हटलं की, “मी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरवरून मुंबईला बरोबरच जाणार आहोत”, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या याविधानाची सध्या चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज्यातील घडामोडींसदर्भात बोलताना नाना पटोले यांनीही सूचक विधान केलं. ते म्हणाले, “सत्तासमीकरणामध्ये सर्वच लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. मात्र, दुसऱ्या पक्षातही खूप गडबडी सुरु आहेत. त्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत.”