लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाच्या आधी इंडिया आघाडी आणि भाजपाचे नेते आपआपली मत व्यक्त करत आहेत. असातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेबुब शेख यांनी अजित पवार गट फूटणार असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला.
त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. यावर अद्याप जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना ‘जयंत पाटील काँग्रेसमध्ये आले तर घेणार का?’, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं.
हेही वाचा : “४ जूननंतर अजित पवार गटाला खिंडार पडणार”, सुनील तटकरेंचा उल्लेख करत शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा!
नाना पटोले काय म्हणाले?
“लोकसभा निवडणुकीच्या ४ जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट रहील की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. देशभरात पुन्हा अनेक नेते काँग्रेसमध्ये यायला लागले आहेत. त्यामुळे राज्यातही आणि महाराष्ट्रात अशा घडामोडी पाहायला मिळतील”, असं नाना पटोले म्हणाले. जयंत पाटील आले तर तुम्ही पक्षात घेणार का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “देशामध्ये सध्या परिवर्तनाची एक लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षातील हायकमांड यावर जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्वजण समर्थन करू”, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
सूरज चव्हाण काय म्हणाले होते?
“१० जून रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याचबरोबर अजित पवारांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते पक्षात येणार आहेत. ४ जूनच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळही मागितली आहे. त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे. ४ जूननंतर शरद पवार गट रिकामा होईल”, असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं होतं.
संजय शिरसाट यांनी काय म्हटलं?
संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना म्हटलं, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उलथापालथी होणार आहेत. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबरोबर ज्यांनी काम केलं, त्यांना आता रोहित पवारांचं ऐकावं लागत आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. रोहित पवारांमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक पाय पक्षाबाहेर आहे”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं होतं.