Maharashtra Cabinet Expansion : विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? यावरून आता विरोधक अनेक सवाल उपस्थित करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारवर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून खोचक टीका केली आहे. महायुतीत मलईदार खात्यांसाठी भांडणं सुरु आहेत. मलईचं खातं कोणाला मिळेल? फक्त यासाठी सरकार काम करत असल्याचा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. तसेच परभणीत घडलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेवरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
नाना पटोले काय म्हणाले?
परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या घटनेबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, “परभणीतील घटनेचा आम्ही निषेध करतो. संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेप्रकरणी आम्ही सरकारकडे कारवाईची मागणी केली. मात्र, आज राज्यात तीन जणांचे जे सरकार आहे, सरकारमध्ये मलाईच्या खात्यासाठी भांडणं सुरु आहेत. मलाईचे खाते कोणाला मिळतात? फक्त यासाठी सरकार काम करत आहे. मग या सरकारने प्रशासनाला जे काही आदेश दिले त्या आदेशाच्या जोरावर परभणीत लाठीचार्ज झाला. मग परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले होते? त्यामुळे यावर देखील कारवाई झाली पाहिजे”, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा : मंत्रीपदाची शपथ कोण घेणार? याद्या ठरल्या? ‘या’ आमदारांच्या नावांची जोरदार चर्चा!
“दिल्लीतील मोदी सरकार ज्या प्रमाणे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करतं. त्याप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील घडतंय का? तसा संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? पण आम्ही महाराष्ट्रात हे कदापि चालू देणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही”, असा इशाराही नाना पटोले यांनी महायुतीच्या सरकारला दिला. विधानसभेच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या प्रकारे आलेला आहे. त्या निकालाच्या धक्यातून लोक देखील बाहेर आलेले नाहीत. निकालाबाबत आजही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये लोक ठराव घेताना दिसत आहेत. तसेच बॅलेटपेपरची मागणी करत आहेत. आम्ही दिलेलं मतदान नेमकं कोणाला गेलं हे शोधण्याचं काम लोक करत आहेत”, असंही नाना पटोले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. तसेच त्यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी टीका केली होती. दरम्यान, यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, “आरोप-प्रत्यारोप हे सर्व पक्षात सुरु असतात. राजकीय मतभेद फक्त काँग्रेसमध्ये आहेत असं नाही. त्यामुळे पक्षांतर्गत ज्या बाबी आहेत त्या पक्षातच सोडवल्या जातात. निवडणुकीत संपूर्ण काँग्रेस सहभागी झाता होता. त्यामुळे पक्षात कोणताही वादाचा विषय नाही तर निवडणुकीत आलेलं अपयश हा आत्मचिंतनाचा भाग आहे”, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.