राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात गुप्त भेट घेतली आहे. काका-पुतण्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलेला गटही सत्तेत सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांनी शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीवरून सूचक इशारा दिला आहे. जनतेच्या मनात महाविकास आघाडीबाबत संभ्रम झालेलं आम्ही सहन करणार नाही, असा सूचक इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा- शरद पवार-अजित पवारांमध्ये काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नाना पटोले म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. असा संभ्रम पुन्हा होता कामा नये, याबाबत स्पष्टता यावी, अशी चर्चा उद्धव ठाकरेंशी झाली. आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की, जनतेच्या मनात महाविकास आघाडीबाबत गैरसमज निर्माण होईल, अशी बाब आम्ही कधीही सहन करणार नाही.”

हेही वाचा- अजित पवारांच्या भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवरही केलं भाष्य, म्हणाले…

शरद पवार-अजित पवारांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीला धोका आहे का? असं विचारलं असता नाना पटोले पुढे म्हणाले, “शेवटी लोकशाहीत जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते. आम्ही मित्रपक्ष म्हणून जेव्हा एकत्रित काम करत असतो, तेव्हा लोक आम्हाला त्याच दृष्टीने पाहत असतात. पण शरद पवार- अजित पवार यांच्या बैठकीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा गोष्टी पुन्हा होता कामा नये, याची काळजी आम्ही दोघं (नाना पटोले व उद्धव ठाकरे) घेत आहोत. या विषयावर आम्ही चर्चा केली. संबंधित भेटीबाबत स्पष्टता यावी, अशी आमची भूमिका आहे. शरद पवारांच्या भूमिकेबाबतही आम्ही चिंता व्यक्त केली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole on sharad pawar and ajit pawar meeting in pune rmm
Show comments