दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले होते. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या या मागणीवर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकार आणि केजरीवाल दोघे मिळून देशाला फसवत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा – “नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा,” केजरीवालांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, सांगितलं कारण
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
“आपल्याला माहिती आहे, की देशाचा रुपया संपायला आलेला आहे. मात्र, आज ज्या पद्धतीने रुपयांची घसरण सुरू आहे, ती वाचवणं गरजेचं आहे. ही मागणी ज्या व्यक्तीने केली आहे. ती व्यक्ती उच्चशिक्षित आहे. त्यांना या विषयाची जाण आहे. मात्र, मतांच्या राजकारणासाठी यापद्धतीने मागणी करत धार्मीक वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासियांची फसवणूक करण्यात आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा – “आता पार दुष्काळाचं वाटोळं…”, शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया!
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. “दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला असून अनेकांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवे आहेत”, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली होती.