राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असा दावा सातत्याने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. असं असताना शिंदे गटाला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या पंधरा दिवसात महाविकास आघाडीचे १० ते १५ आमदार फुटतील, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. त्यांचा बोलण्याचा रोख काँग्रेसकडे होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बच्चू कडू यांच्या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाच्याही वक्तव्यावर काहीही चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. राहुल गांधींची पदयात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली होती, तेव्हाही काही हौशे-नवशे लोकांनी ही पदयात्रा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशा वक्तव्यावर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा- “मी शरद पवारांना नेहमी…”, काँग्रेसवर टीका करताना PM मोदींकडून पवारांचं पुन्हा कौतुक!

‘येत्या काही दिवसांत काँग्रेसचे १०-१५ आमदार फुटतील’ या बच्चू कडूंच्या विधानाबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “कुणाच्याही वक्तव्यावर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. राहुल गांधींची पदयात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली होती. त्यावेळी काही हौशे-नवशे लोकांनी राहुल गांधींची पदयात्रा आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही.”

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

“शिंदे-फडणवीस सरकार पडण्याचं काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतात आहे.त्यामुळे २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरीही विद्यमान सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. कोर्टाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबला आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. त्यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येतील,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं.