Nana Patole Reaction on Balasaheb Thorat Letter : नुकताच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात दुफळी माजली आहे. काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही याप्रकरणावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, थोरातांनी याप्रकरणी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवल्याचं सांगितलं जात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – “…तर काँग्रेसने कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, हे घोषित करावं”; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान
काय म्हणाले नाना पटोले?
“बाळासाहेब थोरात यांनी पक्षातील वरिष्ठांना पत्र लिहिलंय की नाही, याबाबत मला माहिती नाही. माझं त्यांच्याशी काहीही बोलणं झालेलं नाही. त्यांनी असं कोणतंही पत्र लिहिलं असेल, असंही मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
“हा पक्षाचा अंतर्गत विषय”
“काही दिवसांपूर्वीच आमची राज्य कार्यकारणीची बैठक झाली. ही बैठक दर तीन महिन्यांनी होत असते. मात्र, या सर्व प्रकरणावर पक्षांतील नेत्यांची चर्चा व्हावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पुन्हा ही बैठक बोलावली आहे. ही बैठक १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली. तसेच हा आमच्या पक्षाचा विषय असून पक्षांतर्गत सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असेही ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले होते?
विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं जायला नको, या मताचा आहे. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी काल (५ फेब्रुवारी ) दिली.