रविवारी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. मात्र, यापैकी अनेकांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटीचा त्रास झाला. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ११ जणांच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले.
काय म्हणाले नाना पटोले?
काल झालेल्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या सरकारचे कान टोचले होते. ‘मनुष्य ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे’, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला आलेली जनता ही आप्पासाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी आली होती. हा कार्यक्रम शासकीय होता. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक येणार होती, हे सरकारला माहिती होतं, तरीही या सरकारने लोकांसाठी सावलीची व्यवस्था केली नाही. एवढी मानवताही या सरकारमध्ये राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
हेही वाचा – महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना मदतीची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राज्यातील शिंदे सरकारमध्ये आता माणुसकी राहिलेली नाही. याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. देशात आज शेतकरी, बेरोजगारांच्या मृत्यू होतो आहे आणि हे सरकार फक्त जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे. या घटेनेने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, सरकारने चूक झाली हे मान्य रायला हवी, असेही ते म्हणाले.