राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसमध्ये कोणी राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष हळूहळू आपल्या पाठिशी येतोय. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होते. या वक्तव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे, असे आवाहन पटोलेंनी केलं.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना नाना पटोले म्हणाले, “केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘डबल इंजिन’चे सरकार असल्याचं सांगतात. मग, राज्यातील शेतकरी आत्महत्या का करतोय? हे सुद्धा सांगावे. गेल्या एक महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले जाते. पण, फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे.”
हेही वाचा : दिल्लीतील पवारांच्या बैठकीनंतर राहुल गांधी – उद्धव ठाकरे भेटणार का? संजय राऊत म्हणाले…
“नैसर्गिक आपत्तीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही खरेदी करण्यात आला नाही. हरभरा, मका, तूर शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत. बेरोजगार आणि गरिबांचे बेहाल सुरू असून, महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा सत्तेचा लोकांना फायदा मिळवून द्या. फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना काहीच भेटणार नाही,” अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
हेही वाचा : “मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका; आदित्य ठाकरेंनीही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले …
महाविकास आघाडीचे तीन तोंड तीन वेगळ्या दिशेला आहे. त्यांचा एक भोंगा सकाळी ९ वाजता वाजतो. दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी १२ वाजता वाजतो. तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या बद्दल विचारल्यावर नाना पटोलेंनी सांगितले, “फडणवीसांना विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्या हातातील सत्तेचा उपयोग स्वत: आणि बगलबच्चांसाठी चाललेला आहे. मंत्रालयात तिजोरी लुटली जात आहे, हे फडणवीसांनी पाहावे. तसेच, तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे,” असं आवाहन नाना पटोलेंनी केले आहे.