अलीकडील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. राष्ट्रवादीचा भाजपाबरोबर ‘प्लॅन बी’ सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( ९ मे ) साताऱ्यात प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल शरद पवारांना विचारलं. त्यावर, ‘चव्हाणांनी त्यांची पक्षात काय जागा आहे, ते आधी तपासावं,’ असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. “त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे, ते ए आहेत, की बी, सी, डी आहेत ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातील अन्य सहकाऱ्यांना विचारलं की त्यांचं स्थान कोणतं आहे, तर तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार,” असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : “…तर नरेंद्र मोदी तुरुंगात जाऊ शकतात”, प्रकाश आंबेडकर यांचं विधान
नाना पटोलेंचा शरद पवारांवर पलटवार
शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साताऱ्यात प्रश्न विचारला. त्यावर, “हाच सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना विचारल्यावर प्रश्न उपस्थित होईल,” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
“…तर याचा आम्हाला स्वाभिमान आहे”
“पृथ्वीराज चव्हाण यांचं पक्षात १ नंबरचं स्थान आहे. शेवटपर्यंत १ नंबरच असेल. पृथ्वीराज चव्हाण हे आमचे नेते होते आणि राहतील. भाजपाच्या तानाशाहीविरुद्ध लढण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाणांमध्ये आहे. याचा आम्हाला स्वाभिमान आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा : “…तर अजित पवारांनी स्वत:च्या नावासमोर मुख्यमंत्री लावावं”, भाजपा मंत्र्याचं विधान
“जो कोणी भाजपाच्या विरोधात समोर येऊन लढेल, त्याला…”
महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत? असा प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “आम्हाला त्याच्यात जायचं नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जो कोणी भाजपाच्या विरोधात समोर येऊन लढेल. त्याला घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे.”