अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सरड्यासारखा रंग बदलला आहे. सत्तेत गेलेले लोक वास्तव लपवत आहेत. सरड्यासारखं होऊ नका अशी आमची त्यांना सूचना आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. सरडा हा रंग बदलणारा प्राणी आहे. मी त्यांना (अजित पवार आणि धनंजय मुंडे) यांना सरडा म्हणण्याचं कारणच हे आहे की सत्तेत गेल्यानंतर ते आता वेगळंच वागत आहेत असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
इगतपुरीत एका गरोदर मातेचा महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. नाना पटोलेंनी हा मुद्दा जोरकसपणे उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं. भाजपाला सत्तेचा माज आला आहे पण आता लोक हा माज उतरवतील असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपाकडून मूठभर लोकांना सोयी सुविधा दिल्या जात आहेत असाही आरोप नाना पटोलेंनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर भाजपावर टीका केली. त्याबाबत प्रश्न विचारला असता नाना पटोले यांनी राज ठाकरेंनी मांडलेला मुद्दा योग्यच आहे असं म्हटलं आहे. तसंच भाजपावाले टोलमुक्त महाराष्ट्र ओरडत होते त्याचं काय झालं? भाजपाकडून समृद्धी महामार्गावर निर्दोषांची हत्या केली जाते आहे असाही गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. एवढंच नाही तर मणिपूर जळतं आहे, तिथला एक अत्यंत भयंकर व्हिडीओ समोर आला आहे तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीही बोलत नाहीत असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचं सरकार घोषणेचा पाऊस पाडणारं सरकार आहे. या सरकारला आमचं आव्हान आहे की घोषणा करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला भाजपा सरकार जबाबदार आहे असाही आरोप नाना पटोलेंनी केला.