भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाषणास संधी न दिल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ शनिवारी (२१ जानेवारी) चांगलाच चर्चेचा विषय ठरला. या व्हिडीओमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करण्यात आली. जनतेतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यामुळे पुढे बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलं. दरम्यान, याच मुद्द्याला घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपा हा पक्ष बहुजन तसेच ओबीसींचा विरोध करतो. भाजपाकडून ओबीसींच्या नेतृत्वाला दाबून ठेवण्याचे काम केले जाते, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
ओबीसींच्या नेतृत्वाला दाबून ठेवणे ही भाजपाची मानसिकता
“भाजपा पक्षाबद्दल बोलण्यासारखे काही नाही. भाजपा पक्ष बहुजन विरोधी आहे. हा पक्ष ओबीसींच्या विरोधी आहे. हा पक्ष ओबीसींची मतं घेत. पण ओबीसींच्या नेतृत्वाला दाबून ठेवणे ही भाजपाची मानसिकता राहिली आहे. भाजपा दुसऱ्यांचे घर फोडण्याचे काम करत आहे. मात्र जेव्हा त्यांचे स्वत:चे घर फुटेल तेव्हा त्यांना दुसऱ्यांचे घर फोडण्याचे दु:ख कळेल,” असे नाना पटोले म्हणाले.
भाजपाकडून मुख्य मुद्द्यांना डावलण्याचे काम
“भाजपा मुख्य मुद्द्यांना डावलत आहे. शेतकरी, बेरोजगार, महागाईच्या प्रश्नाला डावलेले जात आहे. मात्र हे जास्त काळ चालणार नाही. मी संविधानिक व्यवस्थेला मानणारा आहे. बंडखोर १६ आमदारांवर कारवाई होणार आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,” असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.
व्हिडीओमध्ये काय आहे?
काँग्रेसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे बावनुकळे यांना मला भाषण करू द्यावे, अशी विनंती करताना दिसत आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना भाषण करू देण्यास नकार दिल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करून पंकजा मुंडेंना डावलण्यात येत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.