महाराष्ट्राचं राजकारण हे २०१९ पासून विविध प्रकारच्या अशक्य वाटणाऱ्या वळणांवर जाताना आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी, त्यानंतर अशक्य वाटणारं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार, त्यानंतर एकनाथ शिंदेंचं बंड आणि परवा झालेलं अजित पवारांचं बंड या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना भाजपात फूट पडणार का? अशी चर्चा नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे सुरु झाली आहे. पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा- पंकजा मुंडेंचं बीडवासियांना भावनिक आवाहन; म्हणाल्या, “मला एकदाच तुमची साथ…”
काय म्हटलं आहे नाना पटोलेंनी?
नाना पटोले यांनी भाजपावर हा आरोप केला आहे की, भाजपाने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळीच एक वातावरण निर्माण केलं होतं. तसंच भाजपाचे लोक बेताल वक्तव्य करत होते. काँग्रेसचे लोक पक्षाची साथ सोडतील असं सांगितलं जात होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर पुन्हा एकदा काँग्रेसही फुटणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आमचे कुठलेही नेते सोडून जाणार नाहीत आणि ते वेगळा विचार करणार नाहीत असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन विचिलित करण्यासाठी भाजपाकडून असे काही दावे केले जातात. काँग्रेसची बदनामी सुरु आहे. भाजपाने घरं फोडण्याचंच काम आत्तापर्यंत केलं आहे असंही नाना पटोले म्हणाले. त्याचवेळी त्यांना पंकजा मुंडेंविषयी विचारणा करण्यात आली.
हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच मंचावर येणं ही….” पंकजा मुंडे यांचं वक्तव्य चर्चेत
पंकजा मुंडेंविषयी काय म्हणाले नाना पटोले?
पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याची चर्चा आहे यावर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले, “पंकजा मुंडे या जर काँग्रेसमध्ये आल्या तर आम्ही त्यांचं स्वागतच करु. सोनिया गांधींशी त्यांची याबाबत चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे.” असं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. मात्र सोनिया गांधी यांची पंकजा मुंडेंची भेट झाली का? याविषयी काही माहित नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पण पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्ही त्यांचं स्वागतच करु असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
भ्रष्टाचार भाजपाच्या रक्तात आहे
ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडलं जात आहे. भ्रष्टाचार हा भाजपचा डीएनए आहे. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे. विचारात आहेत. भ्रष्टाचार वाढवणं, भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घालणं हे भाजपा करत आला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीत वेगळं काय घडलं? पण कर्नाटकाच्या लोकांनी त्यांना जागा दाखवलं, अशी टीकाही त्यांनी केली.