काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी (१४ जानेवीर) सकाळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून देवरा यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. ते आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, राहुल गांधींच्या पदयात्रेवरून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी दोन वेळा निवडणुकीत हरलेल्या नेत्याला आपल्या पक्षात घेतलंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच लोकांचं या यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालय, गुन्हे अन्वेषण विभाग, आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्याबरोबर घेत आहेत.
नाना पटोले म्हणाले, काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजपा आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला आपल्याबरोबर घेऊन ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्तीबरोबर असंवैधानिक शिंदे भाजप सरकारचाही शेवट होणार आहे.
हे ही वाचा >> मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला माहिती नाही..”
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीदेखील देवरा यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला. रमेश म्हणाले, “मुरली देवरा यांच्याबरोबरचे दिवस मला आठवतात. मुरली देवरा यांचे सर्वच पक्षांमध्ये मित्र होते. पण, ते नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. तथास्तु!”
हे ही वाचा >> मिलिंद देवरांनी दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पक्ष नेतृत्व तुमच्याशी…”
मिलिंद देवरा यांचा राजीनामा
पक्षाला रामराम करत असल्याचं जाहीर करत मिलिंद देवरा म्हणाले, “आज मी माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आहेत जे मी आज संपवत आहे. इतकी वर्षे मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.”