राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या राजीनाम्याला जोरदार विरोध केला आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच आमचं सर्वस्व. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वतीने केलं आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राऊत यांनी म्हटलं आहे की, एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप-प्रत्यारोप झाले, राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी देखील तेच केलं आहे. परंतु जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना त्यावेळी राजीनामा मागे घ्यावा लागला होता. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.
दरम्यान, आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे. मध्यमांवर अजित दादांबद्दल ज्या चर्चा होत्या, किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादी गोष्ट असेल, किंवा त्यांच्या तब्येतीचं काही कारण असेल, यावर आत्ता बोलणं चुकीचं ठरेल. त्यांना भेटू, सर्वकाही जाणून घेऊ मग यावर बोलणं योग्य ठरेल.
हे ही वाचा >> शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
नाना पटोले म्हणाले, आम्हाला वाटायचं, शरद पवार शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असतील. एका विचारधारेशी लढत राहतील. परंतु त्यांनी कुठल्या कारणामुळे राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे.