काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशभक्त असा उल्लेख केला होता. त्यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावरुन फडणवीसांना प्रश्न विचारले आहेत. तसेच नागपूरमधील एका बड्या नेत्याला टोला लगावला आहे. नाना पटोले म्हणाले हा भाजपावाले देश विकणाऱ्यांना देशप्रेमी म्हणत असतील, देवेंद्र फडणवीसही त्यांना देशप्रेमी म्हणत असतील तर त्यांनी देशप्रेमीची व्याख्या काय आहे ते सांगावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले म्हणाले, देशातली किती संपत्ती त्यांनी (मोदी सरकार) विकली ते त्यांनी जाहीर करावं. किंवा त्याचा एखादा लेख अथवा यादी जाहीर करावी. त्यांच्याकडे यादी नसेल कारण दिल्लीत काय चाललंय हे त्यांना माहिती नसेल. मोदी सरकारविरोधात राज्यातला कोणताही नेता बोलू शकत नाही. नागपूरचे काही नेते बोलत होते, परंतु तेही आता चूप झाले आहेत. तेही बोलू शकत नाहीत. नाना पटोलेंच्या बोलण्याचा रोख केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींकडे होता असं बोललं जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, या सरकारने देशाची किती संपत्ती विकली हे त्यांना माहिती नसेल तर आम्ही ती थोड्याच दिवसात जाहीर करणार आहोत. त्यांनी काय काय विकलं? कोणाला विकलं? कोणत्या मित्रांना विकलं? याबाबतची यादी जाहीर करू. मुळात देश विकण्यासाठी, संविधान संपवण्यासाठी यांना सत्ता दिली होती का असा प्रश्न जनता विचारतेय, देश विचारतोय. काँग्रेस तर प्रश्न विचारणारच. परंतु आता देशातला प्रत्येक माणूस विचारतोय. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल.नाना पटोले टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “अजून वेळ गेली नाही, लग्न करून टाका”, राहुल गांधींना लालू प्रसाद यादवांचा मिश्किल सल्ला, नेमकं काय घडलं?

नाना पटोले म्हणाले, केंद्रातल्या सत्तेचा इतका गर्व करू नये, असा सल्ला आम्ही त्यांना देतोय. कारण, हे सगळं थोड्या दिवसांसाठी आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आणि सीबीआय त्यांच्या हातून जाईल, ही सत्ता जाईल तेव्हा या सगळ्यांची काय परिस्थिती होईल याचा अंदाज त्यांना आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole says nagpur bjp leader was talking against narendra modi now quite asc
Show comments