राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं आहे. पूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याकडे होतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना बरोबर घेत अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केला आणि महायुतीत प्रवेश केला आहे. अजित पवार हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत, त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे. विधानसभेत शिवसेनेकडे केवळ १५ आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडेही १५ ते २० आमदार आहेत. त्यामुळे आता विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. परंतु काँग्रेसने अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्यात विरोधी पक्षनेतेपदाबद्दल चर्चा होईल, असं बोललं जात होतं. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या नेत्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की, आजच्या बैठकीत तुमची शरद पवारांशी विरोधी पक्षनेतेपदाबद्दल काही चर्चा झाली का? विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? काँग्रेसकडून त्याबद्द काही निर्णय घेतला आहे का? त्यावर नाना पटोले म्हणाले, विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा असेल आणि लवकरच त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
नाना पटोले म्हणाले, विधीमंडळाची एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेनुसार ज्या पक्षाचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असतात, त्या पक्षाचा आमदार विरोधी पक्षनेता होतो. आज विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल. पुढच्या आठवड्यात तुम्हाला विरोधी पक्षांचा नेता पाहायला मिळेल.
हे ही वाचा >> “…तर शेकडो प्राण वाचले असते”, मनसेचं ट्वीट चर्चेत; म्हणाले, “इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’
शिंदे गटाची टीका
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काही वेळापूर्वी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी गायकवाड म्हणाले, अजूनपर्यंत विरोधी पक्ष त्यांचा नेता निवडू शकले नाहीत, हे विरोधी पक्षाचं खूप मोठं अपयश आहे. आज विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस होता. परंतु अजूनही विरोधकांना त्यांचा गटनेता निवडता आलेला नाही. कारण विरोधी पक्षांमध्ये संपर्कच नाही. त्यांच्या कितीही बैठका होत असल्या तरी विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचं अद्याप एकमत झालेलं नाही.