काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) गंभीर आरोप केले आहेत. “हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती पुरवल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुळकर आरएसएसचे कार्यकर्ते होते. असं असूनही संघ त्यावर बोलायला तयार नाही,” असा आरोप नाना पटोलेंनी केला. तसेच कुरुळकर त्यांच्या चार पिढ्या संघात असल्याचं सांगत आहे, असंही पटोलेंनी नमूद केलं. ते गुरुवारी (१८ मे) नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, “संघाचे कार्यकर्ते प्रदीप कुरुळकरांनी देशाची माहिती पाकिस्तानला दिली. म्हणजे संघात देशाच्या बरबादीचा प्लॅन केला जात असेल, असा आपण अर्थ लावू शकतो. संघ अद्याप त्यावर बोलायला तयार नाही. संघ म्हणतो आमचा संबंध नाही आणि कुरुळकर म्हणतो की, माझ्या चार पिढ्या संघात आहेत. आता त्यांच्या तत्वांचा प्रश्न आहे.
“संघाच्याच पदाधिकाऱ्याने भाजपाच्या आमदारांना मंत्रीपदाचं आमिष दाखवलं”
“संघाच्याच एका पदाधिकाऱ्याने भाजपाच्या आमदारांना मंत्रीपदाचं आमिष दाखवलं आहे. ही घटनाही भयानक आहे. संघाचा नेमका उद्देश काय? आम्ही जे ऐकत होतो त्याच्या उलट पाहायला मिळत आहे. यावर संघानेच बोललं पाहिजे. संघाचेच लोकं संघाची बदनामी करत आहेत. हे दुर्भाग्य आहे,” असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “भाजप सत्तेत आल्यानंतरच जातीय दंगलीत वाढ”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप, म्हणाले…
“संघाच्या कुशीत मोठी झालेले लोक जसं वागत आहेत ते भयानक”
“संघ खूप विद्वान आणि वैचारिक लोकांची संघटना आहे. त्यामुळे मी त्यावर फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. मात्र, संघाच्या कुशीत मोठी झालेले लोक जसं वागत आहेत आणि त्यातून जे चित्र पुढे येत आहे ते भयानक आहे,” असंही पटोलेंनी नमूद केलं.