शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आमदार भरत गोगावलेंनी जोरदार बॅटिंग केली. ज्यामुळे सुनावणीवेळी हशा पिकला होता. तुम्ही सूरतला का गेलात? अस प्रश्न विचारल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज सूरतले गेले होते म्हणून मी गेलो होतो, असं उत्तर गोगावले यांनी दिलं. गोगावले यांच्या या उत्तरामुळे त्यांच्यावर आता टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावरून गोगावले यांना टोला लगावला आहे.

नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी विधीमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन हे सत्तेत येतात. परंतु, सत्तेत आल्यावर महाराजांचा अपमान कसा करायचा हे विसरत नाहीत. मुळात महाराज सुरतमध्ये तिथली अत्याचारी व्यवस्था उलथवण्यासाठी गेले होते, हा इतिहास गोगावले यांना माहिती नसेल. त्यामुळे त्यांना इतिहास सागितला पाहिजे.

नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लोकांचा लुटलेला खजिना परत आणण्यासाठी सुरतला गेले होते. तुम्ही (शिंदे गट) मात्र गुजरातच्या गुलामीत गेला होता. त्या हॉटेलमध्ये तुम्हाला कसं कस्टडीत (ताब्यात) ठेवलं होतं, तुम्हाला तिथे कसं वागवलं गेलं हे सर्वांना माहिती आहे. सुरतमधल्या एका हॉटेलातला एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ आपण पाहिला आहे, त्यात शिंदे कसे हालत होते ते आम्ही सर्वांनी बघितलं आहे.

हे ही वाचा >> “पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार?”, अजित पवारांचं सभागृहात धक्कादायक वक्तव्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, मी या सत्ताधाऱ्यांना एकच सांगतो की त्यांनी स्वतःची आणि छत्तपती शिवाजी महाराजांची तुलना करू नये. हे लोक त्या लायकीचे नाहीत. ज्या पद्धतीने हे लोक शिवाजी महाराजांचा अपमान करायला निघालेत ते सहन होणार नाही. यांच्या मंत्रिमंडळातले अर्धा डझनहून अधिक मंत्री, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महत्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. या सरकारमधील लोकानी आमच्या महापुरुषांचा आणि दैवतांचा अपमान करण्याचा सपाटाच लावला आहे.

Story img Loader